अंगणातल्या बांगड्या.
लेखक नितीन चंदनशिवे ,
संकलन व संपादन डाॅ रेश्मा पाटील
माधवी ताईने रिंगणं आखली.मातीवर समान एकसारखे एकमेकांना जोडून गोल काढले की अंगणात मोठ्या बांगड्याची नक्षी अंथरलेली दिसायची.एका वर्तुळात ती एका पायावर उभी राहिली.हातातली दगडाची चीफ तिने समोरच्या रिंगणात टाकली.आणि प्रत्येक रिंगणात ती एका पायावर लंगडी घालत खेळू लागली.आम्ही बाजूला उभे राहून टाळ्या वाजवू लागलो.आमचा कालवा वाढला की माधवी ताई ओठावर दोन बोटे ठेवून मोठ्याने शिट्टी वाजवायची.शेवटचं रिंगण जिंकायचं राहिलं होतं माधवी ताईला मोठ्या अंतराने लंगडी घालून तो डाव जिंकायचा होताच.आमचे श्वास रोखले गेले.दगडाची चीफ बरोबर रिंगणाच्या मध्यभागी पडली.तिने आमच्या सगळ्यांवरून एक नजर फिरवली.एक पाय उचलला आणि ती लंगडी घालायला सुरवात करणारच एवढ्यात सीता काकूने मागून येऊन तिच्या पाठीत जोरात धपाटा घातला.तशी माधवी ताई पुढे तोंडावर पडली.नाकाला लागलं होतं.रक्त येत होतं.सीता काकू शिव्या देत होती.माधवी ताई आमच्या सगळ्यांकडे बघून मुसमुसत रडायला लागली.सीता काकूने तिचं मनगट घट्ट पकडलं आणि तिला वढत घराकडे घेऊन गेली.माझी नजर तशीच रिंगणावर एकटक थांबली.आणि तिचा राहिलेला डाव मी पूर्ण केला.आणि जणू काय माधवी ताई जिंकली असा जल्लोष आम्ही केला.
आम्ही लहान होतो.माधवी ताई आमच्यात मोठी होती.आठवीच्या वर्गात होती ती.आणि आम्ही पाचवीच्या.पण माधवी ताई आमच्यातच कायम रमायची.सगळे खेळ आम्ही एकत्र खेळायचो.दर रविवारी दुपारचे जेवण आम्ही सगळे एकत्र करायचो.माधवी ताईला वडील नव्हते.ते तिच्या लहानपणीच वारले होते.सीता काकुला ही एकच मुलगी.दोघीच असायच्या.सीता काकू रानातली कामे हजरीवर करायची.आणि माधवी ताईला शाळा शिकवायची.आता माधवी ताई वयात आल्यासारखी दिसत होती.अंगाने चांगली भरलेली होती.म्हणून तिला सीता काकू असले काही खेळ खेळू देत नसायची.तिच्यावर सारखं लक्ष देऊन राहायची.
माधवी ताई म्हणजे आमच्यासाठी त्या वयात एक भक्कम आधाराचं कुणीतरी आपलं आहे असंच वाटायचं.कुणाच्या घरचं लग्न असलं की आमची माधवी ताई त्या घरात आठ आठ दिवस बिनपगारी राबायची.मेहंदी,रांगोळी,पापड्या बनवणं,शेवया करणं असली कामं करताना कधीच ती कंटाळली नाही.
एके दिवशी सात आठ बायका,चार पाच पुरुष, आणि एक मुलगा सीता काकूच्या घरात जाताना आम्ही पाहिलं.मी त्यांच्या अंगणात बसून राहिलो.आत काय चालले आहे हे कळत नव्हतं.पण इतर बायका बोलताना एवढंच म्हणत होत्या "ठरलं तर बरं होईल बाई पोरीचं."बराच वेळ निघून गेला.तशी माधवी ताई बाहेर आली.हिरवीगार साडी,कपाळावर सगळा कुंकूच कुंकू,ओटीत डझनभर केळी, त्यात एक नारळ,तांदूळ अजून बरंच काही.तेवढं ओझं घेऊन माधवी ताई सगळ्यांच्या पाया पडू लागली.अवघडली होती.तशीच माझ्या घराकडे जायला निघाली मीही मागे आलोच.माझ्या आईने परत तिला कुंकू लावून पुन्हा ओवाळले.तशीच माधवी ताई प्रत्येकाच्या घरात जाऊन पाया पडू लागली.मला गम्मत वाटत होती.मी आईला विचारलं तेव्हा कळलं माधवी ताईचे लग्न ठरलं होतं.
माधवी ताईंच्या लग्नात आम्ही सगळं काही मनापासून केलं.वाडप्याची कामे सुद्धा आम्हीच केली.माधवी ताई जाताना सगळं गाव हंबरडा फोडून रडलं होतं.आम्हीही खूप रडलो तिच्या गळ्यात पडून.ती गेल्यावर सीता काकू तीन दिवस एक सारखं रडत होती.आम्हाला अंगण भकास दिसू लागलं होतं.
महिन्याभरानंतर माधवी ताई संक्रांतीला आली.चार दिवस राहिली.नंतर तिचा नवरा तिला घेऊन गेला.सीता काकूने बरच काही ओझं दिलं.दोन तीन पोती धान्य,लोणचं,सगळं काही.मीच सायकलवर घेऊन फाट्यावर सोडून आलो.गाडीत बसताना ती परत मला मिठीत घेऊन रडली.हातावर पाच रुपये देत म्हणली "भेळ खा बरं का?"मी मानेनेच हो बोललो.तिने डोक्यावरून हात फिरवला आणि गाडीत बसली.कंडक्टरने बेल वाजवली.गाडीने स्पीड वाढवला.माधवी ताईने खिडकीतुन हात बाहेर काढून पुन्हा निरोप दिला.
नंतर माधवी ताई प्रत्येक सणाला येत राहिली.एका नागपंचमीला आम्ही बांधलेल्या झोपाळ्याचे उदघाटन आम्ही तिच्या हस्ते केले होते.तेव्हा माधवी ताई खूप खूप आनंदी दिसली होती.त्यादिवशी मी अंगणात पुन्हा रिंगणं आखली.आणि दगडाची चीफ तिच्या हातात दिली.आणि आम्ही टाळ्या वाजवायला सुरवात केली.तशी तिनेही अगदी तशीच शिट्टी वाजवली.यावेळी सीता काकू तिथं जवळच उभी होती.पण तिच्या डोळ्यात राग नव्हता.कौतुक होतं.पदराने डोळे पुसत पुसत ती माधवी ताईचा खेळ पाहून अगदी तरुण झाल्यासारखं हसत होती.
मला आठवतंय सीता काकू वारली तो दिवस.तिचं प्रेत कितीतरी वेळ आम्ही फक्त माधवीताई साठी ठेवलं होतं.तिला फोन केला होता.ती यायला निघाली होती.पण सीता काकुसाठी हंबरडा फोडणारं मढयाजवळ कुणीच नव्हतं.सगळ्या बायका तोंडाला पदराने झाकून गुमान प्रेताजवळ बसून होत्या.प्रेताजवळ हंबरडा फोडून रडणारे कुणी नसलं की ते प्रेत फार भयंकर दिसतं.अखेर माधवी ताई आली आणि मग हंबरड्याने धुमाकूळ घातला.तासभर रडली.नंतर भावकीने प्रेत उचललं.अग्नी दिला गेला.फक्त सीता काकू संपली नव्हती.संपलं होतं ते माधवी ताईचे कायमचे माहेर.तिचं घर आता कधीच उघडं दिसणार नव्हतं.माधवी ताई पुन्हा कधीच येणार नव्हती.
तीन दिवस झाले होते.सगळे नातेवाईक निघून गेले होते.माधवी ताईने तिचं सामान भरून घेतलं.बाहेर आली.दाराला कुलूप लावताना पुन्हा तिने हंबरडा फोडला.सोबत तिचा नवरा होताच.तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आधार द्यायचा प्रयत्न करत होता.
माधवी ताई अंगणात आली.माझेही डोळे भरून आले.खूप जोराने तिला मिठी मारत तिच्या कुशीत जाऊन खूप रडलो.नेहमी प्रमाणे तिने हातात पाच रुपये दिलेच.
मी म्हणलं"आता परत कधीच नाही येणार तू..?त्यावर माधवी ताईने पुन्हा एकदा वळून घराकडे पाहिलं.ओठ गच्च आत मिठून घेतले.तिला खूप रडायचं होतं पण त्राण राहिले नव्हते.नवऱ्याने निघण्याची खून केली.तशी ती मान हलवून निघते म्हणाली.
ती निघणार एवढ्यात मी अंगणात तशीच रिंगणं आखली.आणि दगडाची चीफ मी तिच्या हातात दिली.माधवी ताईने ती चीफ एका रिंगणात टाकली.माझ्याभोवती सगळेच जमले होते.तिने एक पाय वर केला आम्ही टाळ्या वाजवायला सुरवात केली.माधवी ताईने दोन बोटं ओठांवर ठेवली आणि जोरात शिट्टी मारली.यावेळी तिच्या शिट्टीत फक्त वेदना होती.कायमची ओढ होती.हुरहूर होती.एक दोन पावलं लंगडी घातली.तिने डाव अर्ध्यावर थांबवला..गाडीची वेळ झाली.असे म्हणत माधवी ताई आमच्या नजरेसमोरून कायमची दूर झालीसुद्धा..
अंगणात आखलेली रिंगणं म्हणजे तिच्या हातातल्या बांगड्याच मला कायम आठवतात.आज त्यांचं घरसुद्धा इथं राहीलं नाही.ना रिंगण राहिलं ना अंगण.ती दगडाची चीफसुद्धा कुठे देवत्वाचा आकार घेत असेल माहीत नाही.माधवी ताई आता आई झाली असेल.तिच्या संसारात ती रमली असेल.पण तिच्या मनात मात्र हे सगळं जिवंत असेल.ती मनातल्या मनात लंगडी खेळत असेल.अंगणातल्या बांगड्या आता तिच्या मनगटावर खणखण करत असतील.
अशा कितीतरी माधव्या या जगात आहेत.त्यांचं माहेर मनात जिवंत ठेवून त्याही जिवंत आहेत.आणि माझ्यासारखे सुद्धा कित्येक आहेतच.प्रत्येकाला प्रत्येकाची माधवी ताई कायम आठवत असेल.
पुरुष असलो तरीही मनाच्या आतल्या गाभाऱ्यात मी सुद्धा कधीतरी झिम्मा फुगडी खेळतच असतो.कधी माधवी ताई असते तर कधी आणखी कुणी.
प्रत्येकीला माहेर असतंच असं नाही.आज अनेकजणींचं माहेर हरवलं आहे.तरीही माहेरच्या अंगणातल्या आठवणी मात्र त्यांच्या काळजाच्या गाभाऱ्यात फेर धरून नाचतच असतात.
त्या माधवी ताईच्या हातातल्या बांगड्या कायम हिरव्यागार राहोत.तिचं गाणं कायम आनंदाच्या सुरांनी बहरत राहो.एखादी कविता त्याच माधवी ताईसाठी कायम कागदावर उतरत राहावी याशिवाय दुसरी कसलीच अपेक्षा मनात नाही.
लेखक नितीन चंदनशिवे.
संकलन व संपादन डाॅ रेश्मा पाटील
